औरंगाबाद : बंद पडलेल्या कंपनीचे खराब मोबाइल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने खोकडपुरा येथील आयटक कार्यालय ते जिल्हा परिषदेपर्यंत मोबाइलची अंत्ययात्रा काढण्यात आली.
यासाठी सजविण्यात आलेल्या तिरडीवर मोबाइल संच ठेवून, त्याला हार घालून दुपारी एक वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. ‘राम नाम सत्य हैं’, म्हणत मोबाइलला अखेरचा निरोप देण्यात येत होता. काही कर्मचारी महिला ‘हमारा मोबाईल अमर रहे’ म्हणत होत्या. तिरडीवर फुले उधळण्यात येत होती. एक हजार अंगणवाडी महिला कर्मचारी यात सहभागी झाल्या होत्या.
‘सर्व मोबाइल संच स्वीकारण्यात येतील व ते दुरुस्तीला दिले जातील’, असे आश्वासन जि. प. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरखले यांनी गुरुवारी दिले होते. मात्र, ते आश्वासन शुक्रवारी विसरले व एकेक मोबाईल संच घेतो, असे सांगितले. याचा आयटकने निषेध केला व घोषणाबाजी करीत मिरखले यांच्या केबिनकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांसोबत हुज्जत झाली. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने काही कर्मचाऱ्यांनी केबिनजवळ मोबाइल ठेवून दिले. यावेळीही पोलिसांशी धक्काबुक्की झाली. शेवटी जिल्हा परिषद आवारात शोकसभा घेण्यात आली.
यावेळी शन्नो शेख, मीरा अडसरे, शालिनी पगारे, माया भिवसाने, ज्योती गायकवाड, अभय टाकसाळ, तारा बनसोडे, राम बाहेती यांची भाषणे झाली. ग्रामीण भागातील मोबाइल संच त्या त्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वीकारलेले असताना औरंगाबाद शहरातील नागरी प्रकल्पांपैकी भोईवाडा येथील प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात गेल्या पंधरा दिवसांत कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून मोबाइल परत करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी मोबाइल स्वीकारले नव्हते. मोर्चेकऱ्यांनी नंतर जिल्हा परिषदेतून मोर्चा भोईवाड्याकडे वळविला, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित अधिकारी इंदोले यांनाच जिल्हा परिषदेत पाचारण केले. कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठिय्या मांडला होता.