- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख २७ हजार ७२८ असून विभागाचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३.९३ लाख हेक्टर आहे. एवढी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असताना फक्त ३० वीजअटकाव यंत्रांवर विभागाची सुरक्षा आहे. अतिवृष्टी आणि पर्यावरणातील बदलामुळे मागील दोन वर्षांपासून बारापैकी दहा महिने विजा कोसळण्याच्या घटनांत नागरिक, जनावरांचा जीव गेला आहे.२०२० साली ५५ तर २०२१ साली वीज पडून ७५ जणांचा मृत्यू झाला. २०१५ पासून २०२१ पर्यंत ३५७ जण वीज पडून दगावले. २०२० साली जानेवारी व डिसेंबर वगळता सर्व महिन्यांत विजा पडल्या तर २०२१ साली डिसेंबर वगळता पूर्ण वर्षभर विजा पडल्या.
पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर येतो. दोन वर्षे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती. त्यामुळे पावसाळी आपत्तीकडे विभागीय प्रशासनाने कागदोपत्रीच लक्ष दिले. मागील काही वर्षांतील आढावा घेतला तर विभागात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्यू होण्याचा आकडा वाढतोच आहे.
का पडताहेत मराठवाड्यावर विजा?वातावरणातील अस्थिरतेमुळे क्युमोलोनिंबस ढगांची गर्दी मराठवाड्यावर वाढते आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वड, पिंपळ व इतर देशी झाडे लावून हा बदल रोखणे शक्य आहे. क्युमोलो म्हणजे ऊर्ध्व (वरच्या) दिशेने जाणारे ढग व निंबस म्हणजे पाणी धारण करणारे ढग, यांची वेगाने घुसळण होऊन विद्युत कण तयार होतात, त्यातूनच विजा पडण्याचे प्रमाण वाढते आहे. विभागात जमिनीवरच नव्हे तर ढगांतही वीज वरच्या बाजूने पडत आहेत. यातून सॉफ्ट आणि हार्ड एक्स-रे बाहेर पडून आयनोझायशन होत आहे. यामुळे विजा पडण्याचे प्रमाण वाढत आहे. या सगळ्या वातावरणीय बदलांमुळे मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होत असल्याचे क्युमोलोनिंबसवर अभ्यास करणारे तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
२०१५ ते २०२१ पर्यंत वीज पडून झालेले मृत्यूजिल्हा मृत्यू वीजअटकाव यंत्रऔरंगाबाद --- ३८-- ०४जालना -- ४६ -- ०२परभणी -- ३९ -- ०४हिंगोली --- ३१ -- ०२नांदेड -- ९६ -- ०४बीड -- ५२ -- ०६लातूर -- ३८ -- ०४उस्मानाबाद-- २८ -- ०४एकूण --३५७ -- ३०