छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनांच्या पैशांवरून वाद होऊन सेतू सुविधा केंद्र बंद पडल्याच्या रागातून तरुणाने अर्ध्या अधिक गावाला न्यायालयाच्या बनावट नोटिसा पाठवल्या. कोणाला फसवणुकीच्या प्रकरणात तर कोणाला कर्जबुडीच्या नोटीस पाठवून पार घाबरवून सोडले. याप्रकरणी मंगळवारी दाखल गुन्ह्यात वेदांतनगर पोलिसांनी शरद दिलीप नरवडे (२३) याला बुधवारी अटक केली.
निधोनाच्या (ता. फुलंब्री) काही गावकऱ्यांना सप्टेंबरमध्ये न्यायालयाच्या नावे दंड भरण्यासाठी नोटिसा प्राप्त झाल्या होत्या. प्रमुख न्यायाधीशांचे नाव, सहीसह नोटीस आल्याने अनेकांचे धाबे दणाणले. विठ्ठल आव्हाड (४१), तालेब सत्तार शेख, शोहेल लतिफ शेख यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयामार्फत याबाबत चौकशी सुरू झाली. त्यात जुलै, २०२४ मध्ये न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या विविध पदांच्या भरतीबाबत कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित नोटिसीप्रमाणेच या नोटीस असल्याचे निष्पन्न झाले. त्यात मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सही व शिक्का तसेच ठेवून नोटीसमधील मूळ मजकुरात बदल करून निधोनातील गावकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.
... अन् खाते क्रमांकाची केली चूकवेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी तपास सुरू केला. नोटिसीमध्ये दंड भरल्याची पावती न्यायालयाला पाठवण्याचा उल्लेख होता. मात्र, दंड भरण्यासाठी बँक खाते दिलेले क्रमांक न्यायालयाचे नव्हते. तपासात ते शरदचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर दाट संशय होता. उपनिरीक्षक वैभव मोरे, अंमलदार बाळाराम चौरे, रणजीतसिंग सुलाने, विलास डोईफोडे प्रवीण मुळे यांनी त्याचा शोध सुरू केला. गुन्ह्याबाबत कल्पना नसल्याने शरद गावातच निवांत फिरत होता. पथकाने बुधवारी रात्री गावात जात त्याला अटक केली.
अर्ध्या अधिक गावाला घाबरवलेकाही महिन्यांपूर्वी शरदचे सेतू सुविधा केंद्र होते. त्यामुळे त्याच्याकडे अनेकांचे आधार क्रमांक होते. त्यामुळे काही शासकीय योजनेच्या जमा झालेल्या पैशांवरून त्यांचे गावकऱ्यांसोबत खटके उडाले होते. त्यातच त्याचे केंद्रही बंद पडले. त्याचा शरदला राग होता. त्यानंतर त्याने अर्ध्या अधिक गावाला नोटीस पाठवून घाबरून सोडले.