औरंगाबाद : किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये २४७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिकेकडून देण्यात येणारे जेवण दररोज दुपारी साडेबारा वाजता येते. शुक्रवारी दुपारी चार वाजले तरी जेवण न आल्यामुळे संतप्त रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये अक्षरशः धुडगूस घातला.
सुरक्षारक्षकांना मारहाण करून रुग्ण चक्क रस्त्यावर आले. कर्मचाऱ्यांनी समजूत घातली आणि जेवण आल्यानंतर रुग्णांनी आंदोलन मागे घेतले.शहरात दररोज २५० ते २८० नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अवघ्या चार दिवसांमध्ये किलेअर्क येथील कोविड केअर सेंटर हाऊसफुल होत आले आहे. शुक्रवारी सकाळी सर्व रुग्णांना नाष्टा देण्यात आला होता. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान रुग्णांना महापालिकेकडून जेवण देण्यात येते. दुपारी चार वाजत आले तरी जेवण आले नाही. रुग्णांनी कर्मचाऱ्यांकडे अनेकदा जेवणासाठी पाठपुरावा केला. कंत्राटदाराकडून जेवण पुरविण्यासाठी प्रचंड विलंब झाला. संतप्त कोरोना रुग्णांना राग अनावर झाला. इमारतीमधील सर्व पॉझिटिव्ह रुग्ण प्रांगणात जमा झाले. त्यांनी सुरक्षारक्षकांसोबत धक्काबुक्की सुरू केली. संतप्त रुग्ण ऐकत नसल्यामुळे सुरक्षारक्षकाने गेट लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकाच्या हाताला गंभीर इजा झाली. यानंतर सर्व पॉझिटिव्ह रुग्ण थेट रस्त्यावर आले. महापालिकेच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांची समजूत घातली. इमारतीमध्ये येण्याची विनंती केली. याच वेळी जेवणाची गाडी आली. रुग्ण स्वतः जेवणाचे डबे घेऊन इमारतीत निघून गेले.
सायंकाळपर्यंत रुग्ण इमारतीच्या बाहेरचजेवण केल्यानंतर अनेक रुग्ण सायंकाळपर्यंत इमारतीच्या प्रांगणातच बसून होते. त्यांना सायंकाळचा चहा देण्यात आला. चहा घेत, सर्व रुग्ण सहकुटुंब गप्पा मारत बसले होते. मनपाचे कर्मचारी त्यांना वारंवार आत जाण्याची विनंती करत होते.
रुग्णांनी संयम ठेवावाज्या एजन्सीकडून रुग्णांना जेवण देण्यात येते, त्या एजन्सीच्या वाहनाचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे जेवण येण्यास बराच विलंब झाला. मागील वर्षभरामध्ये एकाही केंद्रावर असा प्रकार झाला नाही. रुग्णांनी प्रशासनाची अडचण समजून सहकार्य करावे.- नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.