जालना : राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात १ जूनपासून २.५० टक्के केलेल्या भाडेवाढीने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात इंधनाचे दर भडकल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही तीनदा प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली. आताही डिझेलचे दर वाढल्याचे व दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे कारण दाखवून महामंडळाने २.५० टक्के भाववाढीचा प्रस्ताव तयार केला. त्यास राज्य मंत्रिमंडळानेसुद्धा हिरवा कंदील दाखवला. १ जूनपासून नवीन भाडेवाढ लागू होणार असून, त्यामुळे लांब पल्ल्यासह सर्व बसेसच्या भाडे दरात मोठी वाढ होणार आहे. या दरवाढीचा ग्रामस्थांना मोठा तडाखा बसणार आहे. त्यामुळेच प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुळात प्रवाशांकरिता फारशा सोयी-सुविधा पुरविलेल्या नाहीत. अनेक मार्गांवर मोठी गर्दी असतांनासुद्धा बसेस सोडल्या जात नाहीत. ग्रामीण भागातील अनेक बसेसच्या फेर्या बंद केल्या. याउलट महामार्गांवर बसेस तैनात करून, महामंडळाने ग्रामस्थांची चेष्टा चालविली आहे. ‘गाव तेथे एसटी’ असा नारा देऊनही आज ग्रामीण भागात २५ टक्के गावांमधून बसेस धावत नाहीत, असा सूर प्रवाशांतून उमटत आहे. (प्रतिनिधी) परिवहन महामंडळाच्या दरवाढीमुळेच आता खाजगी प्रवासी वाहतुकीस मोठे बळ मिळेल, अशी भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात बसेसच्या फेर्या मुळातच कमी झाल्या आहेत. त्याचा फटकाही महामंडळास बसला असून, आता दरवाढीमुळे एसटीस फटका बसेल, असा अंदाज आहे. रेल्वेच्या एक्सप्रेससह पॅसेंजर गाड्यांच्या तिकिटांचे दर एसटीच्या तुलनेत अल्प आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गांवरील शहरांसह गावांमधून एसटीकडे पाठ फिरवून प्रवाशांनी रेल्वेव्दारेच प्रवासास पसंती दिली आहे. परंतु रेल्वे मार्गाव्यतिरिक्त शहरांसह गावांमधून एसटीशिवाय पर्याय नाही, नाईलाजाने एसटीकडे वळावे लागते, अशी खंत अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
भाडेवाढीविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया
By admin | Published: May 28, 2014 11:55 PM