वैजापूर : गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा, तक्रार करूनही पोलीस अणि महसूल विभागाने केलेले दुर्लक्ष, यामुळे शेवटी वाळूमाफियांना रोखण्यासाठी गंगथडी परिसरातील ७ गावांतील तब्बल ४०० ते ५०० संतप्त ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबविला़
यावेळी झालेल्या बाचाबाचीत ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून त्यांना पळवून लावले व १२ ते १५ वाळूने भरलेले हायवा जप्त केले. विशेष म्हणजे तब्बल दोन तास चालेल्या थरारनाट्यानंतरही घटनास्थळी पोलीस व महसूलचा एकही अधिकारी फिरकला नाही. अखेर वजनदार पुढाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांची समजूत काढल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात तक्रार न देता मिटले.
तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर वाहन घालणे, वाहने पळवून नेण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने गंगथडी परिसरात जप्त केलेल्या वाळू साठ्याचे लिलाव झालेले आहेत. मात्र याच्या बाजूलाच असणाऱ्या गोदावरी नदीपात्रातूनही अवैद्यरीत्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे केल्या. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही़. त्यात गुरुवारी वैजापूर व गंगथडी परिसरातील वाळूमाफिया समर्थकांमध्ये वाळू उपशावरून जोरदार धुमश्चक्री झाली.
त्यामुळे पुरणगाव, बाभूळगाव, नांदूर डोक, लाखगंगा, सावखेडगंगा, डोणगाव आणि पुलतांबा येथील ग्रामस्थांचा शुक्रवारी उद्रेक झाला. ४०० ते ५०० ग्रामस्थ सकाळी दहा वाजता पुरणगाव-बाभूळगाव रस्त्यावर एकत्र आले व ते वाळू वाहतूक सुरू असलेल्या मार्गावर गेले़ त्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्यांना विरोध केल्याने ग्रामस्थ व वाळूमाफियांमध्ये वाद झाला. वाद होताच वाळूमाफियांनी अवघ्या काही मिनिटांतच त्यांच्या समर्थकांचा जमाव याठिकाणी बोलावून ग्रामस्थांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ व वाळूमाफिया समर्थकांमध्ये दोन तास जोरदार धुमश्चक्री झाली. काही वेळाने राजकीय पुढारी घटनास्थळी आल्याने हा वाद मिटल्यानंतर जमाव व गावकरी घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर वीरगाव पोलीस या ठिकाणी पोहोचले. मात्र, कुणीही तक्रार करण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी परिसरातील नागरिकांशी चौकशी करून तपासाचा प्रयत्न केला.
वैजापूर तालुक्यातील वाळूमाफियांपुढे प्रशासनाने जणू हात टेकले आहेत. सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा अन् माफियांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष, असा प्रकार चालला आहे. वाळूसाठा लिलावात बोली बोलून एकदा ठेका घेतला गेला की, प्रशासनाच्या आशीर्वादाने तस्करी करणारे वाळू ठेकेदार गब्बर बनल्याचे दिसत आहे. तलाठी, सर्कल, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी हे सर्व जण आपल्या खिशात आहेत, अशा अविर्भावात ते वावरत असल्याचे चित्र आहे.