वाळूज महानगर : वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीतील पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन सरपंच व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पाणी पुरवठा करण्यात आला.
गावातील अजवानगर, दत्त कॉलनी, शिवाजीनगर आदी भागात मार्चपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीकडून आठवडाभराच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात होता.
मात्र, आजघडीला या नवीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहेत. गावाला पाणी पुरवठा करणारी एक सार्वजनिक विहीर कोरडी पडली असून, रामराईरोडवरील विहिरीच्या पाणी पातळीतही घट झाली आहे.
गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने गरवारे उद्योग समुहाकडून गावात दररोज जवळपास ५० हजार लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अजवानगरातील महिला व नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंचासह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अनिता धिर, अमिना खान, योगिता चव्हाण, लंका मालोदे, करिमा बेगम, छाया देशमुख आदींनी सरपंच पपीन माने व पदाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. या प्रसंगी सरपंच माने यांनी एमआयडीसीने पाणी पुरवठ्यात कपात केल्याने तसेच विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर या परिसरात तात्काळ पाणी पुरवठा सुरु करुन संबंधित दोन कर्मचाºयांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्याचे सरपंच माने यांनी सांगितले.