बनोटी : परिसरात जनावरे चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. रविवारी मध्यरात्री वरठाण गावात मंदिरासमोर बांधलेली सहा जनावरे चोरीस गेली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जनावरे चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय बनल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतशिवारातून घरी नेऊन बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल वीस जनावरे बनोटी, वरठाण आणि तिडका येथून चोरीस गेल्याचे समोर आले. सोयगाव पोलीस बनोटी परिसरात रात्रीच्या गस्तीस असून देखील दररोज जनावरे चोरीस जात असल्याने पोलीस प्रशासन देखील हैराण आहे.
बनोटी येथील लालचंद सुरळे यांची सहा जनावरे मंगळवारी (दि. २७ एप्रिल) रोजी चोरीला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी रमेशलाल जैन यांच्या शेतातून दोन दुभत्या म्हशींची चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, शेतवस्तीवरील नागरिकांमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वरठाण येथील भरतसिंग सोळंके यांच्या वरठाण शिवारातून गट नं. १९७ मधील चार गाई, जि. प. शाळेजवळील धरमसिंग जाधव यांची एक गाय, तिडका- बनोटी रस्त्यालगत दादाराव पवार यांच्या मालकीची एक गाय व तिडका येथील सुभाष राहटे यांच्या गट नं. १२५ मधील एक बैलजोडी चोरीस गेली. त्याचबरोबर रविवारी मध्यरात्री वरठाण गावातील गजबजलेल्या मारोती मंदिरासमोर विकास फत्तेसिंग महाले यांच्या तीन गाई, एक बैलजोडी, दोन म्हैशी व धरमसिंग जाधव यांची एक गाय, चोरीस गेली. अज्ञात चोरट्याविरुद्ध बनोटी चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.