औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. याचा प्रत्यय मागील १५ दिवसांच्या काळात आला. योग्य नेतृत्व व समन्वयाचा अभाव असल्याने प्रगती होऊ शकली नाही. आगामी काळात नकारात्मक प्रतिमा सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालयातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे साहित्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एका क्लीकवर उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, संचालक डॉ.धर्मराज वीर, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. संजय सांभाळकर, डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. संजय गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू म्हणाले, गेल्या काही काळात संशोधनाचा दर्जा रसातळाला गेला आहे. भरमसाठ शोधनिबंध व प्रबंध सादर केले जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. या संशोधनात गुणवत्ता आणण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न केले जातील, असेही डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या ग्रंथालयात देशातील पहिल्या टॉप टेनमध्ये जाण्याची क्षमता आहे. या इमारतीमध्ये १५० आसनाची क्षमता असलेले सभागृह लवकरच बांधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना किशोर शितोळे म्हणाले, अण्णाभाऊ व टिळक यांचे साहित्य कमी वेळेत ऑनलाईन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या केंद्राला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. ग्रंथालयाचे संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चक्रधर कोठी यांनी केले. आभार सहायक ग्रंथपाल सतीश पद्मे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शाहिस्ता परवीन, डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माहितीशास्त्रज्ञ गजानन खिस्ते, प्रोग्रामर माधुरी कुलकर्णी, गणेश कड, सूरज लव्हंदे, मंगल फरताडे, विजया सूर्यवंशी, कविता तुपे, इरफान शेख, मंगल बागूल, शेख हनिफ आदींनी प्रयत्न केले.