लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातून वाळूज परिसरातील ९ गावे वगळण्यात आली असून, त्यांचा समावेश महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष नियोजन प्राधिकरणात करण्यात आला आहे. या गावांतील घरे, दुकाने व वसाहतीतील बांधकामे वगळण्यात यावीत, यासाठी शेतकरी व कामगार बचाव कृती समिती व नागरिकांनी नगररचना विभागाकडे हरकती नोंदविल्या आहेत.राज्य शासनाने महिनाभरापूर्वी सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणारी वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी, घाणेगाव, कमळापूर, जोगेश्वरी, साजापूर, वडगाव आदी गावे वगळली होती. या गावांचा समावेश महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळात करण्यात आलाआहे.शासनाने महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून निवड केली आहे. वर्षभरापूर्वी सिडकोने या गावांतील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात नागरिकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी ‘शेतकरी व कामगार बचाव कृती समिती’ स्थापन करून सिडकोच्या विरोधात एल्गार पुकारला होता. आता शासनाने एमआयडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून निवड केल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला.नगररचना विभागाकडे संजय शेरे यांना बांधकामे वगळण्यासंदर्भात निवेदन देऊन कामगारांची घरे वाचविण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी सोमनाथ हिवाळे, गंगाराम हिवाळे, शिवाजी शिरसाठ, गंगाधर जाधव, काकासाहेब कान्हेरे, अप्पासाहेब मखरे, गौतम चोपडा, देवीदास श्रीमाळी आदींची उपस्थिती होती. यावेळी जवळपास ३५० तक्रारी नगररचना विभागाकडे करण्यात आल्या.
‘नगररचना’वर हरकतींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:08 AM