लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: राज्यातील सत्तेत असलेला मित्रपक्ष शिवसेनेला सोबत न घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला रिपाइंने मात्र साथ देण्याची घोषणा केली आहे़ इतकेच नव्हे, तर १० जागा लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे़ विशेष म्हणजे, भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता रिपाइं पदाधिकाऱ्यांनी एकतर्फी हा निर्णय घोषित केला आहे, हे विशेष़महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे़ आजचे चित्र पाहता भाजपाकडे जाणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे़ भाजपाच्या प्रवेश सोहळ्यालाही प्रारंभ झाला आहे़ त्यामुळे भाजपातील नेत्यांची पावलेही आता जमिनीवर राहिली नाहीत़ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे़ ती भूमिका सार्वजनिकही केली आहे़ मात्र भाजपाने अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही़ असे चित्र असताना रिपाइंने मनपा निवडणुकीची बैठक घेऊन आपला निर्णय घोषित केला आहे़ प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे़ त्यात सोनवणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, गौतम काळे, शिवाजी भालेराव यांचा समावेश आहे़ मनपा निवडणुकीत भाजपासोबत राहून १० जागा रिपाइं लढवणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे़ ३१ जुलैपर्यंत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहनही केले आहे़बैठकीस बालाजी धनसरे, डी़ डी़ वाघमारे, अफरोज खान, अॅड़ प्रकाश ठाणेकर, विठ्ठल शेट्टी, निशाताई सोनवणे, रेखा गायकवाड, जयशीला सोनवणे, आशिष कांबळे, मोहंमद अथर, निवृत्ती सोनकांबळे, शिवाजी गोडबोले आदींची उपस्थिती होती़
रिपाइंची भाजपासोबतच राहण्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:40 AM