औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध ७ अभ्यासमंडळ अध्यक्ष तसेच ७ अभ्यासमंडळ सदस्यांची निवड स्थायी समितीच्या शिफारशीनंतर जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ अंमलात आल्यापासून विद्यापीठ स्थायी समितीचे अध्यक्ष हे प्रकुलगुरु आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्थायी समितीची बैठक झाली. मागील अडीच वर्षांतील अधिकार मंडळाच्या रिक्त जागांसाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मान्यतेने स्थायी समितीच्या बैठकीत शिफारसी घेण्यात आल्या. प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. राहुल मस्के, डॉ. सतीश दांडगे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भारत खंदारे, शेख जहुर खलीद, कुलसचिव तथा सदस्य सचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत अध्यक्ष पदासाठी शिफारसी करण्यात आलेल्या उमेदवारांची अर्हता तपासून प्रशासनाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये निवड झालेले अध्यक्ष असे, डॉ. दिलीप खैरनार (समाजशास्त्र अभ्यासमंडळ), डॉ. गोविंद कदम (शारीरिक शिक्षण संचालक मंडळ), डॉ. सय्यद अखिल गौस (ऊर्दु), डॉ. प्रशांत पगारे (शैक्षणिक तत्वज्ञान), डॉ. दादासाहेब शेंगुळे (पदार्थविज्ञान), डॉ. सिध्दीकी मो. रफिक एजाज (शारीरिक शिक्षण महाविद्यालये मंडळ), डॉ. यशवंत चव्हाण (अर्थशास्त्र) आदींचा समावेश आहे. आता हे सातही अभ्यासमंडळाचे अध्यक्ष हे विद्या परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. याच बैठकीत डॉ. मनिषा वंजारी, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. राजेंद्र उढाण, डॉ. जयश्री पाटील, डॉ. बाळनाथ पवार व डॉ. विक्रम खिल्लारे या सात जणांची अभ्यास मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विद्या परिषदेची बैठक १५ फेब्रुवारी रोजीआता १२ ऐवजी १५ फेब्रुवारी रोजी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महात्मा फुले सभागृहात सकाळी ११ वाजता बैठक सुरु होईल.