औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैठण येथील संतपीठ सुरु करण्यासंदर्भात घोषणा करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संत साहित्य, तत्वज्ञान आणि संगीत विभागाअंतर्गत तुकाराम गाथा परीचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी कीर्तन, हरीदासी कीर्तन, एकनाथी भागवत परिचय प्रमाणपत्र हे ५ अभ्यासक्रम प्रत्येकी २० विद्यार्थी संख्येने सुरु करण्यात येणार आहे. त्याला २० ते २२ सप्टेंबरपासून प्रवेश सुरु होतील. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
एमजीएम विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी ते बोलत होते. मंत्री सावंत म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणा संदर्भात डाॅ. माशेलकर यांच्या समितीचा अहवाल १४ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल. त्यानंतर केंद्राच्या धोरणातून काय तातडीने स्विकारायचे त्याचा खर्चानुसार तीन चार भाग करुन तातडीने राबवण्यासंदर्भात निर्णय होईल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गंत जरी आज पैठणचे संतपीठ असले तरी भविष्यात विद्यार्थी संख्या वाढली, प्रतिसाद वाढल्यावर शासन हे विद्यापीठ स्वतंत्र करण्यासंदर्भात पावले उचलेल. विद्यापीठाअंतर्गत संतपीठ झाले यात कुठेही कमीपणा नाही. संतपीठ हे विद्यापीठाच्या तोडीचेच असेल. अशी ग्वाही सावंत यांनी दिली.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या