छत्रपती संभाजीनगर: सात वर्षानंतर आज येथे झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ५९ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली. सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. शिवाय अर्थसंकल्पात मंजूर निधीशिवाय आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने मंत्रीमंडळाने मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने, पुसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
आ. दानवे म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्च करून आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेविषयी उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आला. पण पैठण तालुक्याची उपसा सिचंन योजना आणि गंगापुर तालुक्यातील ३७५ गावांकरीता वॉटर ग्रीड योजनेसाठी १०७५ कोटी महाविकास आघाडी सरकारनेच मंजूर केली होती. महाराष्ट्रात १३००हून अधिक आणि मराठवाड्यात ७८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. मंत्रीमंडळ बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केले. मात्र, मराठवाड्यातील जनतेसाठी विशेष पॅकेज न देता सन २०१६मध्ये केलेल्या घोषणांचाच पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. नांदुर मधमेश्वर कालव्यासाठी २३४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील २१६४ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. यातील मराठवाड्यासाठी केवळ ७४ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारी कादगपत्रे सांगतात. जालना येथे सीड पार्कची घोषणा करण्यात आली. या सीड पार्कसाठी एमआयडीसीची जागा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी १४ हजार कोटीची तरतूद निव्वळ थापमराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची घोषणा म्हणजे निव्वळ थाप आहे. या योजनेच्या सर्वेक्षण करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. अद्याप सर्वेक्षणच झाले नाही, तर १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कोणत्या कामासाठी केली, असा सवाल त्यांनी केला.
शहराच्या नामांतराचे श्रेय बाळासाहेबांनाचऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नांमातर करण्याच्या निर्णय राज्यसरकारने घेतला,याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या शहाराचे पहिले नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला होता. यामुळे याचे श्रेय केवळ बाळासाहेब आणि महााविकास आघाडी सरकारलाच जाते.