औरंगाबाद: कामधंद्याच्या शोधात औरंगाबादला आलेल्या मध्यप्रदेशातील मजूराच्या पत्नीवर ठेकेदाराने अत्याचार केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी समोर आली. याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन एमआयडिसी सिडको पोलीस ठाण्यात नराधम ठेकेदारावर गुन्हा नोंदविला.
मधूसूदन सरकार( रा.पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव असून तो त्याच्या राज्यात पळून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना समजली. प्राप्त माहिती अशी की, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील दांपत्य लॉकडाउन समाप्तीनंतर (दोन महिन्यापूर्वी ) औरंगाबादला आले. कामाचा शोध घेत असताना चिकलठाणा एमआयडीसीतील एका बांधकाम साईटवर हे दांपत्य गेले. तेथे त्यांना आरोपी ठेकेदार भेटला. तेव्हा त्याची नजर मजूराच्या ३० वर्षीय पत्नीवर पडली. त्याने या दांपत्याला काम दिले. ऐवढेच नव्हे तर नारेगांव येथे खोली किरायाने घेऊन दिली.
यानंतर अधूनमधून तो या दांपत्याच्या घरी जाऊ लागला. ५ ते १० सप्टेंबरदरम्यान महिलेचा मजूर पती कामावर आल्यावर आरोपी मधूसूदन त्याच्या घरी जात असे. पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार केला. हा प्रकार पिडितेने तिच्या पतीला सांगितला. यानंतर त्याने तिला धीर दिला आणि आरोपी ठेकेदाराविरूध्द पोलिसांत तक्रार करण्याची तयारी दर्शविली.
दरम्यान, ही कुणकुण नराधमाला लागताच तो पळून गेला. पडितेने १५ ऑगस्ट रोजी आरोपी मधूसूदन सरकारविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड या गुंह्याचा तपास करीत आहेत. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती उपनिरिक्षक लाड यांनी दिली.