औरंगाबाद : जटवाडा रोडवरील विद्यालयात पाच ते सतरा वयाच्या दिव्यांग गतिमंद मुला-मुलींना एकत्र स्रान घालण्यात आल्याच्या पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या कथित प्रकाराबद्दल बुधवारी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा प्रकार जटवाडा रोडवरील शरद पवार निवासी गतिमंद विद्यालय येथे सुरू होता. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा समाजकल्याण कार्यालयाने शाळा अध्यक्षासह, मुख्याध्यापक, अधीक्षक, काळजी वाहक आणि पहारेकऱ्यासह शाळा कमिटी पदाधिकाऱ्याविरुद्ध हर्सूल ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदविला. मुख्याध्यापक साजीद बादशाह पटेल, अधीक्षक योगेश जानू राठोड, मदतनीस मोहम्मद जाकेर, पहारेकरी संतोष मोरसिंग पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शौकत पठाण, उपाध्यक्ष राजू पवार, अंजली अन्वीकर, सदस्य किरण हिवराळे, पालक प्रतिनिधी अर्चना साळवे, शिक्षक प्रतिनिधी भाऊसाहेब काकडे, कर्मचारी प्रतिनिधी जाकेर मंजूर शेख, परिचारिका सदस्य शीतल देवरे, संस्थाध्यक्ष बादशाह पटेल, अशी आरोपींची नावे आहेत.
याविषयी हर्सूल पोलिसांनी सांगितले की, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाला प्राप्त तक्रारीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने तक्रारदार एस.डी. साळुंके यांनी १३ मार्च रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान शाळेला भेट दिली. यावेळी शाळेच्या दरवाजावर पहारेकरी नव्हता. यानंतर त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता ५ ते १७ वयाची दिव्यांग गतिमंद मुले-मुली एकत्र स्रान करीत असल्याचे दिसले. याशिवाय त्यांना ९.२० वाजेपर्यंत कोणताही आहार देण्यात आला नव्हता. शाळेत उपस्थित अधीक्षकांना त्यांनी याविषयी विचारणा केली असता मुले-मुली रोज एकत्र अंघोळ करतात, असे त्यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम कलम ९२ सह अन्य फौजदारी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याविषयी साळुंके यांनी सविस्तर अहवाल जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांना सादर केला. अहवाल दिल्यानंतर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार साळुंके यांनी बुधवारी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फौजदार पांडुरंग भागिले तपास करीत आहेत.