औरंगाबाद : दारूच्या नशेत तर्र असलेल्या तरुणाने पराक्रम दाखविण्यासाठी त्याच्याजवळचा चाकू उगारला आणि जवळच बसलेल्या कुत्रीवर फेकून मारला. चाकूचा जबर मार लागल्यामुळे पुढच्या काही मिनिटांतच त्या मुक्या कुत्रीला जीव गमवावा लागला. यश बचके असे तरुणाचे नाव असून कुत्रीच्या मालकाने त्याच्याविरुद्ध बुधवारी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मुक्या प्राण्याचा आणि विशेषकरून कुत्रीचा अमानुषपणे जीव घेण्याच्या घटना सातत्याने शहरात घडत आहेत. विशेष म्हणजे ही कृत्ये करणारी सर्व मुले तरुण असून तरुणांमध्ये वाढणारी ही विकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे.
बुधवार ९ रोजी सायंकाळी पाणचक्की परिसरात काही लहान मुले खेळत होती. परिसरातील एका कुटुंबाचे कुत्रेही याच परिसरात होते. त्याचवेळी १९ वर्षीय यश बचके हा तरुण दारू पिऊन तिथे आला आणि त्याच्या जवळचा चाकू काढून आता हा चाकू कुणाला मारू, असे मुलांना विचारू लागला. पुढच्या काही वेळातच त्याने तो चाकू शेजारी बसलेल्या कुत्रीला फेकून मारला आणि तिचा निर्दयीपणे जीव घेतला. ही घटना मुलांनी लगेचच कुत्रीच्या मालकाला जाऊन सांगितली असता त्यांनी तात्काळ छावणी पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्याचे समजताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
कलम ४२९ अंतर्गत गुन्हातक्रार नोंदविल्यानंतर आरोपीच्या घरच्या लोकांच्या भीतीमुळे कुत्रीचे मालक तक्रार मागे घेण्याच्या विचारात होते. परंतु औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांना याप्रकरणी खंबीर साथ देत तक्रार मागे न घेण्याचे सुचविले. जीव गमावलेली कुत्री गरोदर होती, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. तरुणावर कलम ४२९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे असोसिएशनच्या अध्यक्षा बेरील सँचिस यांनी सांगितले. कलम ४२९ अंतर्गत पाळीव प्राण्याचा जीव घेणे, मारहाण करणे, छेडछाड करणे हा गुन्हा असून याअंतर्गत आरोपीला ५ वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते.