औरंगाबाद : निपाणी गाव व शिवारात अनेकांचा चावा घेणाऱ्या वानरामुळे मोठी दहशत पसरली होती. अखेर वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने त्या वानराला जेरबंद करून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. त्यामुळे आता गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मागील काही दिवसांपासून निपाणी गावात या वानराने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयास निपाणी येथील सरपंचांनी माहिती दिली. वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने घटनास्थळी जावून वानराच्या हालचालीवर पाळत ठेऊन त्यास रात्री जेरबंद केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या उपद्रवी (चावा घेणाऱ्या) वानरास पकडण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करीत शीघ्र कृती दलाने डार्ट गन, स्नेअर पोल, शिडी, दोरी व जाळीच्या साहाय्याने त्याला पकडले.
या पथकाने केली कामिगरी
यावेळीं उपवनसंरक्षक एस. व्ही. मंकावार, शीघ्र कृती दलाचे प्रमुख तथा सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे, कन्नडचे वनपरिक्षेत्राधिकारी अण्णासाहेब पेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी सी. एम. महाजन, औरंगाबाद शीघ्र कृती दलाचे सदस्य एम. ए. शेख, प्रकाश सूर्यवंशी, अमोल वाघमारे, एच. के. घुसिंगे, एस. एम. माळी, ए. डी. आव्हाड यांच्यासह वन्यजीव अभ्यासक आदी गुडे, वनसेवक परशराम राठोड यांनी वानराला पकडण्याची कामगिरी यशस्वी केली. यावेळी सरपंच सूर्यवंशी, स्थानिक वनरक्षक निकिता मोकासे यांचे सहकार्य लाभले.
(फोटो )