खुलताबाद ( औरंगाबाद) : बाजार सावंगी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याने विषारी द्रव्य प्राशन केलेल्या एका तरुणाला वेळीच प्राथमिक उपचार मिळाले नाहीत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार करण्याऐवजी रूग्णांसोबतच्या नातेवाईक व ग्रामस्थांना शिवीगाळ केली. यामुळे हतबल नातेवाईक उपचारासाठी औरंगाबादकडे घेऊन जात असताना तरुणाचा वाटेतच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे. वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद असल्याने वेळीच प्राथमिक उपचार झाले नाहीत, यामुळे औरंगाबादकडे घेऊन जाताना तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
खुलताबाद तालुक्यातील धामणगाव येथील दादाराव शेषराव आघाडे (३५) याने रविवारी दुपारी अडीच वाजता विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती गंभीर झालेल्या दादारावला धामणगावचे उपसरपंच विकास कापसे व नातेवाइकांनी बाजार सांवगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी तीन वाजता उपचारासाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत तुपे यांना उपचारासाठी पाचारण करण्यात आले असता ते मद्यधुंद अवस्थेत होते.
नातेवाईकांनी जाब विचारला असता डॉ. तुपे यांनी गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णावर उपचार करण्याऐवजी आरडाओरडा सुरु केला. डॉक्टरांची अवस्था पाहून नातेवाईकांनी दादारावस तत्काळ औरंगाबादला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाटेतच दादाराव याचा मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार मिळाले असते तर दादाराव वाचले असते असा दावा नातेवाईकांनी केला आहे. मद्यधुंद डॉ. तुपे उपचार करू न शकल्याने दादारावचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइक व लोकप्रतिनिधी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिली.
माजी उपसभापती प्रभाकर शिंदे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप निकम, धामणगावचे उपसरपंच विकास कापसे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारसांवगी यांनी पंचनामा करून तशी नोंद व्हिजीट बुक मध्ये केली आहे. कामावर असताना मद्यप्राशन करून आरोग्य केंद्रात धिंगाणा घालून शिवीगाळ करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुपे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी माजी उपसभापती प्रभाकर शिंदे, संदीप निकम यांनी केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची वाईट अवस्था असून डॉक्टर असूनही रूग्णांना त्याचा फायदा होत नाही. तक्रारीकरून ग्रामस्थ थकले, पंरतू आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी सुधारले नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.