वाळूज महानगर : घरात घुसून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape on Minor Girl in Aurangabad ) करणारा आरोपी आकाश प्रतापसिंग सत्तावन (२१, रा. जोगेश्वरी) या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही खळबळजनक घटना रांजणगाव शेणपुंजीत रविवारी (दि.१९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
पीडित अल्पवयीन मुलगी आई-वडील व बहिणीसह रांजणगाव शेणपुंजी परिसरात राहते. ती इयत्ता दहावीत शिकते. या अल्पवयीन मुलीने तिच्या आईचा मोबाईल ऑनलाईन अभ्यासाठी घेतला होता. मुलींच्या मोबाईलवर सतत अनोळखी क्रमांकावरून फोन येत होते. या सततच्या फोनमुळे मुलीने ही माहिती वडिलांना दिली. पीडितेच्या वडिलांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून फोन वापरणारा आकाश प्रतापसिंग सत्तावन यास घरी बोलावून फोन न करण्याची तंबी दिली होती. आकाशला मुलीने तेव्हा पहिल्यांदा बघितले होते.
दुसऱ्या मजल्यावर नेऊन अत्याचारमुलीची आई रविवारी सकाळी कंपनीत कामासाठी गेली होती. वडील दुपारी जेवण करून टेलरिंगच्या दुकानात कामासाठी गेले. पीडितेची बहिण कपडे वाळू घालण्यासाठी घराच्या गच्चीवर गेली असता आरोपी आकाश हा पीडितेच्या घरात घुसला. आरोपीने तिचे तोंड दाबून घराच्या दुसऱ्या मजल्यावर अर्धवट बांधकाम असलेल्या ठिकाणी ओढत नेले. पीडितेला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या पीडितेने वाळू त्याच्या तोंडावर फेकली. तेव्हा त्याने पळ काढला. पीडितेची बहिण कपडे टाकून आली असता तिने या प्रकाराची माहिती दिली. रात्री कामावरुन आई-वडील घरी परतल्यानंतर मुलीने त्यांना ही बाब सांगितली. आईने तिला सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोना. बाबासाहेब काकडे, पोना. प्रकाश गायकवाड आदींच्या पथकाने सोमवारी (दि.२०) रात्री ९ वाजेच्या सुमारास रांजणगावातून आकाशला अटक केली.