औरंगाबाद : दरवर्षी नवीन गहू, ज्वारीची आवक फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वार्षिक धान्य खरेदी केली जाते. यातही एप्रिल-मे महिन्यात धान्यात सर्वाधिक उलाढाल होत असते. यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने महाराष्ट्रातील गहू खराब झाला. जो हाती आला त्याचा रंग फिका पडला. या परिस्थितीत काही भागात अवकाळी पाऊस कमी पडल्याने तेथील गव्हाचा रंग टिकून राहिला. तसेही औरंगाबादच नव्हे तर महाराष्ट्रातील गव्हाची मागणी गेल्या २० ते २५ वर्षांपासून मध्यप्रदेश पूर्ण करीत असतो. यंदा मध्यप्रदेशातील काही भागालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने तेथील गव्हाचा रंग फिका पडला होता. यंदा गुजरात व राजस्थानमध्ये अवकाळी पाऊस न झाल्याने तेथील रंगदार व दर्जेदार गहू बाजारात आला. या गव्हाची हातोहात विक्री झाली. ग्राहकांनी मध्यप्रदेशातील महाग शरबती गव्हाऐवजी गुजरातच्या तुकडी गव्हाला अधिक पसंती दिली. गुजरातचा गहू १,८५० ते २,४५० रुपये, राजस्थानचा १,८५० ते २,२०० रुपये, तर मध्यप्रदेशातील १,४०० ते २,७०० रुपये व स्थानिक १,३०० ते २,५०० रुपये क्विंटल विकला गेला. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, वार्षिक गव्हाच्या एकूण विक्रीपैकी ५० टक्के गहू गुजरातमधील विक्री झाला. २० टक्के गहू मध्यप्रदेशातील, तर प्रत्येकी १५ टक्के गहू राजस्थानील व स्थानिक विक्री झाला. हंगामात बाजारपेठेत रोज सुमारे साडेतीन हजार ते ४ हजार क्विंटल गव्हाची विक्री झाली असून, गव्हात सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल झाली. बाजारपेठेत संपूर्ण देशातून तांदळाची आवक होत असते. सुमारे ७० प्रकारचा गहू बाजारात उपलब्ध होता. यंदा बासमती तांदळाने भावाचा उच्चांक गाठला आहे. ओरिजनल बासमती तांदूळ १४० ते १५० रुपये किलोने विकला जात आहे. भाववाढीने बासमतीची विक्री अवघी ५ ते १० टक्के इतकीच झाली. यंदा विदर्भातील कालीमूछ व कोलम तांदळाला ग्राहकांनी पहिली पसंती दिली. एकूण तांदळाच्या विक्रीत निम्मा तांदूळ हाच विकला गेला. कालीमूछ ५,००० ते ५,८०० रुपये, तर कोलम तांदूळ ५,००० ते ५,६०० रुपये क्विंटल विक्री झाला. तांदळाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, हंगामात शहरात रोज ५० टन तांदळाची विक्री झाली. यात २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल झाली. वार्षिक धान्य खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील महिन्यात शालेय साहित्य खरेदीकडे ग्राहक लक्ष केंद्रित करतील. यामुळे धान्य बाजारपेठेतील उठाव घटेल. धान्य वाळविण्यात अडचणी वर्षासाठी खरेदी केलेल्या गव्हाला घरात कीड लागू नये म्हणून त्याला उन्हात वाळविण्यात येते. मात्र, यंदा दुपारी कडक ऊन तर थोेड्याच वेळात ढगाळ वातावरण, तर सायंकाळी पाऊस अशा अनपेक्षित बदलांमुळे धान्य वाळविताना अडचणींना तोंड द्यावे लागले. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होते. यामुळे मे महिन्यातच वार्षिक धान्य खरेदी संपुष्टात येते.
वार्षिक धान्य खरेदी अंतिम टप्प्यात पोहोचली
By admin | Published: May 19, 2014 1:24 AM