लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयकर विभागाने बेनामी मालमत्तेविरोधात रणशिंग फुंकले आहे. बेनामी मालमत्ता शोधण्यासाठी खास बेनामी प्रोव्हेबिशन युनिट (बीपीयू)ची स्थापना करण्यात आली आहे. या नवीन विभागाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. एक व्यक्ती काळ्या पैशातून मालमत्ता खरेदी करते, पण त्या मालमत्तेस दुसऱ्या व्यक्तीचे नाव दिले जाते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते तिला बेनामदार असे म्हणतात आणि त्या मालमत्तेला बेनामी म्हणतात. ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्च केले आहेत ती खरी या मालमत्तेची मालक असते आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी असतो. जो खरा मालक आहे त्यालाच त्या संपत्तीचा वापर करायला मिळतो अथवा त्यावर मिळणारे भाडे तो स्वत:कडे ठेवतो. अशा बेनामी मालमत्ताधारकांना शोधण्यासाठी आयकर विभागाने बीपीयू विभाग तयार केला आहे. याचे कार्यालय नाशिक येथे आहे. त्यासाठी खास आयकर अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. बीपीयू या विभागांतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व मराठवाडा विभागाचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रधान आयकर आयुक्त श्रीदयाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, बेनामी मालमत्तेवर कारवाई करण्यासाठी १९८८ मध्ये बेनामी प्रॉपर्टी अॅक्टची निर्मिती करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात याची प्रभावीपणे अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे. बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) सुधारित कायदा २०१६ नुसार नाशिक येथील आयकर विभागात ‘बीपीयू’ विभाग कार्यरत झाला आहे. बेनामी मालमत्ता शोधणे, त्याचा अहवाल तयार करणे आदी प्रक्रियेतून सिद्ध झालेली बेनामी मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
बेनामी मालमत्ता आयकरच्या रडारवर
By admin | Published: July 15, 2017 12:47 AM