लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : १ ते ३ जानेवारीदरम्यान शहरात दगडफेक करून वाहनांचे नुकसान आणि पोलिसांना जखमी करणा-या आणखी १६० जणांची ओळख विशेष तपास पथकाला झाली आहे. अटकेच्या भीतीपोटी दंगेखोर पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.पोलीस आयुक्त म्हणाले की, कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर शहरातील विविध भागांत दगडफेक, वाहने जाळण्याच्या घटना घडल्या. यात ४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. शिवाय सुमारे सव्वाशेहून अधिक वाहनांचे नुकसान झाले. काही वाहने जाळण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत १०५ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांवर दगड भिरकावणा-या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांना पुराव्याच्या आधारे पकडण्यासाठी आम्ही विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने दोन दिवसांत विविध व्हिडिओ शूटिंग आणि प्रसारमाध्यमातील छायाचित्रे पाहून आणखी १६० दंगेखोरांची नावे समोर आणली. हे दंगेखोर अटकेच्या भीतीपोटी चार दिवसांपासून पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एकाही व्यक्तीला आम्ही पुराव्याशिवाय अटक करणार नाही, मात्र दंगेखोरांना भडकावणा-यांना आम्ही सोडणार नाही, असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.
एसआयटीकडून आणखी १६० दंगेखोरांची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:04 AM