औरंगाबाद : छावणी हद्दीत आज पहाटे मिसबाह काॅलनीत पुन्हा एक एटीएम तोडण्याचा प्रयत्न शनिवारी रात्री झाला. रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरट्यांनी पडेगाव येथील एटीएम गॅस कटर मशीनने कापण्यास सुरुवात केली. यावेळी आवाज झाल्याने एटीएम असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या वृद्धाला जाग आली.
त्यानंतर वृद्धाने या घटनेची माहिती पोलिसांना आणि एटीएम शेजारी असलेल्या किराणा दुकान मालकाला कळविली. दुकानदार आपल्या लोकांना घेऊन आला आणि त्यांनी चोरट्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी पकडले जाण्याच्या भीतीपोटी चोरट्यांनी दुकानदारावर उलट दगडफेक केली आणि ते त्यांच्या वाहनातून नगरनाक्याच्या दिशेने पसार झाले. सतर्क वृद्धामुळे आज आणखी एका एटीएमची चोरी वाचली. सुमारे दहा ते पंधरा लाखाची रोकड यात असावी अशी चर्चा सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक तुषार देवरे आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
दरम्यान, शुक्रवारी रात्री चोरट्यांटी रोकड लुटण्यासाठी चक्क एटीएम मशीनच चोरून नेल्याचे समोर आले. सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय झाले आहेत. बायपासवरील दत्त मंदिरासमोर भारतीय स्टेट बॅंकेचे अनेक वर्षापासून एटीएम सेंटर आहे. सेंटरवर दोन एटीएम आहेत, परंतु येथे सुरक्षारक्षक नसतो. शुक्रवारी एटीएममध्ये जवळपास २५ लाखाची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार काल दुपारीच मशीनमध्ये रक्कम जमा करण्यात आली होती.