औरंगाबाद: शिवसेनेच्या आमदारांमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर आता पक्ष पातळीवर देखील शिंदे-ठाकरे अशी मोठी लढत पहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या होताना दिसत आहेत. हिंगोलीत संतोष बांगर यांची निवड जाहीर केल्यानंतर आता औरंगाबादच्या जिल्हाध्यक्ष पदी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची शिंदे गटाने नियुक्ती केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलाढाल झाली आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री पद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा पक्ष ताब्यात घेण्याकडे वळवल्याने टोकाचा संघर्ष होणार हे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून दूर केलेल्या बंडखोर आमदार संतोष बांगर यांना शिंदे गटाने हिंगोलीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती दिली आहे. तसेच ठाण्यात देखील शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पाच आमदारांचा पाठिंबा दिलेल्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना शिंदे गटाने जिल्हाध्यक्ष पद दिले आहे.
शिंदे यांना खुले समर्थन देऊन थेट उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या जवळचे म्हणून जंजाळ यांची ओळख आहे. जंजाळ यांनी युवासेनेच्या उपसचिव पदावरून ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली होती. त्यावेळी जंजाळ यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष आ. अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता शिवसेनच्या जिल्हाध्यक्ष पदी जंजाळ यांची निवड झाल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले आहे.