औरंगाबाद : मागील वर्षभरात महापालिकेने योग्य आर्थिक नियोजन केल्यामुळे देशातील शिखर संस्था असलेल्या आयसीआरएच्या क्रेडीट रँकिंगमध्ये औरंगाबाद महापालिकेची पत सुधारली आहे. पालिकेला 'सी' वरुन ट्रिपल बी प्लस हा दर्जा मिळाला आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच हा दर्जा मिळाल्यामुळे मोठ्या प्रकल्पांसाठी भागभांडवल उभे करणे शक्य होणार आहे.
महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे राज्यातील नगरपालिका, महापालिकांची पत निश्चित करण्यासाठी आयसीआरटी लिमिटेड या संस्थेची नेमणूक केली होती. पत निश्चित करताना मुदतीत कर्जाची परतफेड, नवीन भांडवली विकासकामे, महसूल जमा करणे, उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन आदी बाबींचा विचार केला जातो. या सर्व बाबी लक्षात घेऊन शिखर संस्थेने औरंगाबाद महाापलिकेला ट्रिपल बी प्लस हे रँकिंग जाहीर केले आहे. अलीकडेच केंद्र शासनाने देशभर आमच्या शहरातील गुणवत्तेसंदर्भात रँकिंग जाहीर केली. त्यामध्ये ही औरंगाबाद शहराची समाधानकारक सुधारणा झाली.
यापूर्वी समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी भागभांडवल उभारण्याच्या उद्देशाने महापालिकेची पत ठरवण्यासाठी क्रिसील या संस्थेला नियुक्त केले होते. या संस्थेने २०१२ यावर्षी पालिकेची पत निश्चित करताना ‘क’ (सी) हा दर्जा दिला होता. यंदा त्यात चार टप्प्यांनी वाढ झाली असून ट्रिपल बी प्लस दर्जा मिळाला आहे. या दर्जामुळे पालिकेची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू होईल, असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेला भागभांडवल उभे करणे आता शक्य होणार आहे असा उल्लेख त्यांनी केला. आयसीआरए संस्थेला व्यवस्थित माहिती उपलब्ध करून देणे त्यांच्या विविध प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचे संपूर्ण काम मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी केले आहे.