छत्रपती संभाजीनगर : शहराला दि. २० फेब्रुवारीपासून अतिरिक्त पाणी मिळेल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आली होती. मुबलक पाणी तर सोडाच; आठवड्यातून एकदा मिळणारे पाणीही नागरिकांना मिळायला तयार नाही. त्यात मजीप्राकडून पाणीपुरवठ्यात प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी सुरू करण्यासाठी किर्लोस्कर कंपनीकडून ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप आले नाहीत. तेव्हापर्यंत ४०० अश्वशक्तीचे ३ पंप लावून शहरात २५ एमएलडी अतिरिक्त पाणी आणण्याचा घाट रचण्यात आला आहे.
७५ एमएलडी अतिरिक्त पाणी शहरात आणण्यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्यात आली. बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी मनपाच्या जुन्या जीर्ण जलवाहिनीवरून क्रॉस कनेक्शन घेऊन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची टेस्टिंग घेतली. ही चाचणी अपयशी ठरली. मनपाची जलवाहिनी वारंवार फुटू लागली. अधिकाऱ्यांनी याचे खापर मजीप्राच्या क्रॉस कनेक्शनवर फोडले. मजीप्रा अधिकाऱ्यांनी पलटवार करताना मनपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दोष कोणाचाही असला तरी शहरातील १८ लाख नागरिकांना झळ बसत आहे, याची जाणीव कोणालाच नाही.
तीन पंप, २५ एमएलडी पाणी९०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू करण्यासाठी मजीप्रा जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथे ४०० हॉर्सपॉवरचे ३ पंप बसविणार आहे. याद्वारे शहरात अतिरिक्त २५ एमएलडी पाणी आणण्यात येईल. या कामासाठीही आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे मजीप्राचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.
पंप येण्यास होतोय उशीरमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन जलवाहिनीसाठी चार हजार अश्वशक्तीचे दोन पंप तयार करून मागविले आहेत. हे पंप येण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहेत. चार हजार अश्वशक्तीचे एक पंप १०० एमएलडी पाण्याचा उपसा करू शकतो. दुसरा पंप स्टँडबाय पद्धतीने राहील. पंप बसविण्यासाठी किमान दहा दिवस लागतील. पर्यायी उपाययोजना म्हणून तीन पंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी कोळी यांनी सांगितले.
१ मार्चपूर्वी पाण्याची शक्यता कमीचमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. तीन पंप बसविण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होईल, हे लवकरच दिसून येईल. छोटे पंप, मोठे पंप बसविण्यासाठी वेळही बराच लागणार आहे. १ मार्चपूर्वी शहरात मुबलक पाणी येण्याची शक्यता धूसरच आहे.