औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यात मागील तीन महिन्यांपासून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. एवढे करूनही प्रशासनाला पाहिजे तसे यश मिळालेले नाही. शहरात सर्वत्र आजही पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. आता जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन्ही जलवाहिन्यांवरील मोठे तर शहरातील काही छोटे व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत. यासाठी कोलकाता येथून विशेष व्हॉल्व्हची ऑर्डर देण्यात आली असून, या कामावर तब्बल दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत, विशेष.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात लक्ष घातले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाणीप्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठ्यात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला दररोज नवीन नवीन आदेश प्राप्त होतात. त्यानुसार सध्या जलवाहिन्या टाकणे, व्हॉल्व्ह बदलणे आदी अनेक कामे सुरू आहेत. शहरात येणारे पाणी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये थोडासा दिलासा प्रशासनाला मिळाला. पाण्यात वाढ झालेली असतानाही शहरातील विविध वसाहतींना पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येताेय. जूनअखेरीस पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्याचा दावा प्रशासनाने केला होता.
आता व्हॉल्व्ह बदलण्याचा प्रयोग केला जात असून, कोलकाता येथील आयबीएम कंपनीकडून व्हॉल्व्हची खरेदी करण्यात आली. यासाठी एक कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार असून, ही रक्कम तातडीने कंपनीला देऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात व्हॉल्व्ह येणार आहेत. मुख्य पाइपलाइनवरील १५ मोठे व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी गळती रोखण्यास मदत होऊन पाइपलाइन दुरुस्तीसाठी लागणार वेळ वाचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात छोट्या जलवाहिन्यांवरील १०० व्हॉल्व्ह बदलण्यात येतील.