छत्रपती संभाजीनगर : मागील दहा दिवसांपासून महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) शहरासह जिल्ह्यातील केमिकल कंपन्यांवर छापेमारी सुरू आहे. पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकलनंतर अपेक्स मेडिकेम कंपनीवर छापा टाकून तब्बल १०७ लिटर द्रव मेफेड्रोन जप्त केले. या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजारमूल्य १६० कोटी रुपये असल्याची माहिती 'डीआरआय'ने दिली आहे. यात कंपनी संचालकासह व्यवस्थापकास अटक केली आहे.
आरोपींमध्ये कंपनीचा संचालक सौरभ विकास गोंधळेकर (४०, रा. उस्मानपुरा) आणि शेखर पगार (३४, रा. पैठण) यांचा समावेश आहे. 'डीआरआय'च्या माहितीनुसार २० ऑक्टोबर रोजी पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल कंपनीसह आरोपी जितेशकुमार हन्होरिया प्रेमजीभाई पटेल याच्या घरातून २५० कोटी रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन आणि केटामाइन ड्रग्ज जप्त केले. त्यावेळी मास्टरमाइंड जितेशकुमार याच्यासह शंकर कमावत यास अटक केली होती. त्याच छाप्यावेळी अपेक्स मेडिकेम कंपनीची तपासणी केली होती. तेव्हापासून 'डीआरआय'चे पथक कंपनीवर पाळत ठेवून होते.
आरोपी जितेशकुमार पटेल याच्या माहितीवरून २८ ऑक्टोबर रोजी सकाळी अपेक्स मेडिकेम कंपनीच्या दोन युनिटवर छापा टाकला. ही कारवाई तब्बल ३५ तास चालली. त्यात कंपनीच्या दोन युनिटमधून ड्रममध्ये ठेवलेले १०७ लिटर द्रव मेफेड्रोन जप्त केले. या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजारमूल्य १६० कोटी रुपये आहे. याप्रकरणी कंपनी संचालक सौरभ गोंधळेकर आणि व्यवस्थापक शेखर पगार या दोघांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्यानंतर रविवारी दुपारी दीड वाजता अटक केली. दोन्ही आरोपींना सिडको पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. अधिक तपास डीआरआयचे अधिकारी करीत आहेत.