औरंगाबाद, दि. 3 : भागीदारांना २७ कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आर.के. काँन्स्ट्रोचा मालक बिल्डर समीर मेहताविरुध्द शनिवारी (दि. २) आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वी मेहताविरूद्ध सिडको, क्रांतीचौक आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, मेहताने हिरापुर येथील जमीन मालक विजय अग्रवाल व त्यांच्या साथीदारांशी करारनामा करत जागेचा मुख्त्यारनामा स्वत:च्या नावे केला होता. करारनाम्यानुसार बांधकाम झालेल्या इमारतीमधील फ्लॅट विक्री करण्याचे अधिकार मेहता यास दिले होते. यानुसार मेहताने जुलै २०११ मध्ये वर्तमानपत्रात आर. के. फोर्थ डायमेंशन या गृहप्रकल्पाची संपुर्ण माहिती दिली होती. ही जाहिरात वाचून टिळकपथ येथील प्रविण नंदकुमार पारीक (४२) यांच्यासह त्यांचे भाऊ संजीव पारीक यांनी हिरापुर येथील गृहप्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले.
मात्र, त्यावेळी बांधकाम सुरु करण्यात आले नव्हते. मेहताच्या प्रतिनिधीने त्यांना प्रकल्पात उद्यान, आर. ओ. कनेक्शन, गजेबो हॉल, पार्टी लॉन्स जिमखाना आणि फंक्शन हॉल अशा सोयीसुविधा देणार असल्याचे सांगितले होते. त्यावरुन ते आरोपीच्या भाग्यनगरातील कार्यालयात गेले. यानंतर गृहप्रकल्पातील इमारत क्र. १३ मधील २ बीएचके फ्लॅट क्र. ४ हा प्रविण पारीक यांनी पत्नी मीना यांच्या नावे १३ लाख ७५ हजारात बुक केला. यानंतर धनादेशाद्वारे तसेच बँकेकडून कर्ज घेत पारीक यांनी ११ लाख ७२ हजार २८५ रुपये मेहताला दिले.
करारनाम्यानुसार नोव्हेंबर २०१४ मध्ये आरोपी तक्रारदार यांना फ्लॅट ताब्यात देणार होता. करार संपवून तीन वर्ष उलटले तरी आरोपीने फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले नाही. बँकेने त्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड सुरू झाली. आरोपीने आपली फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी त्यास याविषयी वारंवार विचारणा केली. आरोपीने सतत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान त्यास भागीदारांचीच फसवणुक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केल्याचे कळताच त्यांनी शनिवारी क्रांतीचौक ठाण्यात मेहता विरूद्ध फिर्याद नोंदविली.
अन्य ग्राहकांनाही गंडवलेपारिक यांच्यासह सचिन रणसुबे, अशोक बदाडे, गजानन नालेगावकर, अनिरुध्द तडलिंबेकर आणि वनमाला राजपुत या ग्राहकांनाही मेहताने अशाच प्रकारे गंडवले आहे. या सहा जणांच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल हे करत आहेत.
केला होता पुन्हा करारनामा.मेहता ग्राहकांना फ्लॅटचा ताबा देत नसल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ग्राहकांनी मेहताविरुध्द तक्रार केली होती. तत्कालीन आयुक्तांनी याप्रकरणीसमन्वय घडवून आणत मेहताला ग्राहकांशी करारनामा करण्याचे सांगितले होते. त्यानुसार मेहताने ग्राहकांशी करारनामा केला होता. ज्या फ्लॅट धारकांनी ५० टक्के रकमेपेक्षा जास्त रक्कम बिल्डरला दिली आहे, त्या ग्राहकांना फ्लॅटचा ताबा देईपर्यंत उर्वरीत रक्कम मागू नये, ३० एप्रिल २०१७ पर्यंत फ्लॅट ताब्यात द्यावे, बिल्डरने तसे न केल्यास ग्राहकांकडून घेतलेली रक्कम व रजिस्ट्रीचा खर्च यावर २१ टक्के व्याज देण्याचे ठरले होते.