वाळूज महानगर: चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाच्या पळवा-पळवी मुळे बदनाम झालेल्या वाळूज पोलिसांनी चोरी गेलेला दुसरा हायवाही सापडल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विटखेडा परिसरातून सोमवारी पोलिसांनी हायवा जप्त करुन चालकाला ताब्यात घेतले.
शेंदूरवादा परिसरात गंगापूर महसूल पथक १३ नोव्हेंबरला गस्त घालत असताना पथकाला येथील बाजार तळ परिसरात वाळूची चोरटी वाहतूक करताना हायवा (एमएच - २०, सीटी - ९८८९) मिळून आला होता. पथकाने कारवाई करत वाळूसह हायवा जप्त करुन पोलीस पाटील जयराम दुबिले यांच्या ताब्यात दिला होता. मात्र, त्याच रात्री वाळू माफियांनी जप्त केलला हायवा पळविला होता. हा प्रकार उघडकीस येताच तलाठी एस.एल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाळूज पोलीस ठाण्यात हायवा चालक अनिल मनोरे व मालक अजय चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हायवा शोध सुरु केला होता.
दरम्यान, विटखेडा परिसरात चोरी गेलेला हायवा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. फौजदार तुषार देवरे, पोकाँ. संदीप बोर्डे, रवि बहुले, संजय दांडगे आदीच्या पथकाने छापा मारुन चालक अनिल मनोरे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच मनोरे याने लपवून ठेवलेला हायवाची माहिती दिली. या माहितीच्या अधारे पोेलिसांनी हायवा जप्त करुन पोलीस ठाण्यात आणला.
फरार असलेला हायवा मालक अजय चौधरी याचा पोलीस शोध घेत आहेत. महसूल पथकाने कारवाई करुन जप्त केलेला दोन हायवा पळविल्या गेल्याने पोलिसांची नाचक्की झाली होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करीत चोरीला गेलेल्या दोन्ही हायवाचा शोधून काढले.