- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून आठ कोटी रुपयांचे इनक्युबेशन केंद्र दोन दिवसांपूर्वी मंजूर झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. यात राज्यातील विविध शासकीय आणि खाजगी विद्यापीठांचा समावेश आहे. मराठवाड्यातून औरंगाबादच्या विद्यापीठाची निवड केली. यामुळे विद्यापीठात उभारण्यात येणारे हे दुसरे इनक्युबेशन केंद्र ठरणार आहे.
विद्यापीठात बजाज कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व निधीतून (सीएसआर) इनक्युबेशन केंद्र उभारले आहे. या केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले असून, त्यातून कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे इनक्युबेशनसंदर्भात एक योजना सुरू केली आहे. या योजनेतून विद्यापीठाला इनक्युबेशन केंद्र मिळावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत सादर केला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीला एनक्युबेशनच्या समन्वयक डॉ. भारती गवळी यांनी हजेरी लावली. त्यावेळी जाहीर केलेल्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे केंद्र आठ कोटींचे आहे. त्यात आणखी दोन कोटींची भर पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत होणार कार्यक्रमविद्यापीठासह राज्यातील इतर संस्थांना मंजूर झालेल्या इनक्युबेशन केंद्राच्या मंजुरीचे पत्र मुंबईत ३ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण विद्यापीठ प्रशासनाला मिळाले आहे.
‘स्टार्टअप इंडिया’ यात्रा निघणारस्टार्टअप इंडिया या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र स्टेट’ ही यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा १५ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत येणार असून, १६ तारखेला बीड जिल्ह्यात असणार आहे. राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचणार आहे. यात समाजातील प्रत्येक घटकाला उपस्थित राहता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्यात येईल. यात सहभागी होणाऱ्यांना आपल्याकडे असणाऱ्या कल्पना, नावीन्यता मांडता येतील. त्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्यांचा स्टार्टअपसाठी विचार केला जाणार असल्याचेही समजते.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फायदाविद्यापीठाला केंद्र आणि राज्य सरकारकडून एक इनक्युबेशन केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राचा फायदा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्या केंद्रातून विद्यार्थी ते उद्योजक असा प्रवास घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू