औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील पळून गेलेल्या दोन कैद्यांचा शोध लागलेला नसताना बुधवारी रात्री आणखी एका कैद्याने पलायन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जेल पोलिसांनी गुरुवारी सकाळी मिटमिटा परिसरात त्याला पकडले आणि पुन्हा जेलमध्ये डांबले. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात नोंद केली नाही.
याविषयी विश्वसनीय सूत्राने सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यासह अन्य गंभीर गुन्हे असलेला भोसले नावाचा न्यायाधीन कैदी हर्सूल कारागृहात आहे. सध्या त्याला जळगाव रोडवरील एसबीओ शाळेतील प्रति जेलमध्ये ठेवले आहे. एसबीओए शाळेत तयार केलेल्या तात्पुरत्या जेलमध्ये सुमारे १५५ कैदी आहेत. बुधवारी रात्री पोलिसांची नजर चुकवून भोसलेने तेथून धूम ठोकली. जेलच्या नियमानुसार दर काही तासांनंतर कैद्यांची शिरगिनती केली जाते. मध्यरात्रीनंतर तेथील पोलिसांनी कैदी मोजले असता एक कैदी कमी दिसून आला. भोसले पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नातेवाईक पडेगाव, मिटमिटा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्याचा शोध घेत असताना मिटमिटा येथे सकाळी तो पोलिसांच्या हाती लागला. याविषयी जेल अधीक्षक हिरालाल जाधव म्हणाले की, रात्री अशी घटना घडली नाही. शिवाय आमचे सर्व कैदी आमच्याजवळ आहेत.