औरंगाबाद : कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी एका रॅकेटचा गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. आरोपीकडून चार रेमडेसिविर इंजेक्शन, कार, दोन मोबाईल आणि ३१ हजार ५०० रुपये रोख जप्त केले.
नितीन अविनाश जाधव (२८, रा. कोहीनूर कॉलनी) आणि गौतम देवीदास अंगरक (रागादिया विहार) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी जाधवची पत्नी आरती ढोले ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी) येथे कोविड वॉर्डात कंत्राटी नर्स म्हणून कार्यरत आहेत. आरोपी अंगरक हा चोरट्या मार्गाने २५ हजार रुपये प्रतीनग या दराने रेमडेसिविर विक्री करतो अशी माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, औषधी निरीक्षक जीवन जाधव,हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, रितेश जाधव,विशाल पाटील, आनंद वाहुळ, ज्ञानेश्वर पवार आणि शिनगारे यांच्या पथकाने एक डमी ग्राहक म्हणून आरोपी अंगरक याच्यासोबत संपर्क केला. यावेळी अंगरक याने रेमडेसिविर इंजेक्शनकरीता २५ हजार रुपये दर सांगितला. पोलिसांनी त्याला दर मान्य असल्याचे सांगून इंजेक्शन घेऊन रेल्वेस्टेशन परिसरात बोलावले. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. सायंकाळी अंगरक आणि जाधव एका कारमधून हॉटेल विटस ते रेल्वेस्थानक रस्त्यावर आले. पोलिसांच्या डमी ग्राहकाला ते भेटताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याजवळ चार रेमडेसिविर इंजेक्शन, ३१ हजार ५०० रुपये रोख, आठ लाखांची कार आणि दोन मोबाईल हॅण्डसेट आढळून आले. याप्रकरणी जीवन जाधव यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
चौकट
आरोपी जाधवच्या नर्स पत्नीने दिली रेमडेसिविर
आरोपी जाधवची पत्नी आरती नितीन जाधव - ढोले ही घाटीतील कोविड वॉर्डात नर्स आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अंगरक याने त्यांच्याकडील रेमडेसिविर हे नितीन जाधवने दिल्याचे सांगितले. तर नितीन याने त्याच्या पत्नीकडून ही इंजेक्शन आणल्याची कबुली दिली. आरतीला २० हजार रुपये प्रती माह असे वेतन आहे. तिने रुग्णाचे रेमडेसिविर पतीला काळ्याबाजारात विक्रीसाठी पुरविल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी आरती जाधव - ढोले हिचा आरोपीमध्ये समावेश आहे. यामुळे पोलिसांकडून तिला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
चौकट...
गौतम अंगरकच्या व्हॉट्सॲपमध्ये १० मोबाईल क्रमांक
आरोपी अंगरक यांच्या मोबाईलमधील १० वेगवेगळ्या क्रमांक असलेल्या व्यक्तीसोबत रेमडेसिविर सह अन्य इंजेक्शनची खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचे समोर आले. त्याचे औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक आणि अन्य शहरात लोकांसोबत व्यवहार केल्याचे सृत्राने सांगितले.