- बापू सोळुंकेऔरंगाबाद : आरोग्य विभाग नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर, या विभागातील अधिकाऱ्यांनी केलेला नोकरभरती घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी थेट परीक्षेत नापास झालेल्या आठ उमेदवारांना नेमणुका दिल्या. नेमणुकांनुसार हे उमेदवार राज्यातील आठ परिमंडळांतर्गत रुग्णालयात रुजू झाले; परंतु आरोग्य विभागाने अचानक त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे समोर आले.
राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीसाठी गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडण्यात आला होता. हा परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर राज्य सरकारला ही परीक्षा रद्द करावी लागली होती. विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या गट पदासाठी लेखी परीक्षेत ४५ टक्के अथवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनाच निवडसूची बनविताना पात्र समजण्यात येईल, असा नियम करण्यात आला होता. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार या भरतीसाठी अनुत्तीर्ण अर्थात अपात्र होते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आरोग्य विभागातील आयुक्त, आरोग्य संचालक, आरोग्य उपसंचालक(शुश्रूषा) मुख्य प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांची समिती होती. या समितीने पात्र उमेदवारांची निवडसूची तयार केली आणि त्यांना राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात नेमणुका दिल्या. ही प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका पदाच्या लेखी परीक्षेत ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या (नापास) आठ उमेदवारांना २७ ऑक्टोबर २०२१ रोजी नेमणुका देण्यात आल्या.
भानगड लक्षात येऊ नये म्हणून आठ उमेदवारांच्या आठ विभागांत नेमणुकामुंबईतील आरोग्य विभागात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांनी हा घोटाळा करताना खबरदारी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नापासांना नोकऱ्या देताना त्यांच्या नेमणुका राज्यातील विविध आठ परिमंडळांतर्गत कार्यरत शासकीय रुग्णालयात केल्या. यापैकी औरंगाबाद परिमंडळातील परभणी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात युवराज शिवाजी पवार यांना, तर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात अमित राजू गायकवाड यांची नेमणूक केली होती.
दोन महिन्यांनंतर सेवेतून बडतर्फअनुत्तीर्ण उमेदवारांना सेवेत घेतल्याचा प्रकार अंगलट येऊ शकतो, अशी कुणकुण समितीला लागली. यानंतर ६ डिसेंबर २०२१ रोजी आरोग्य उपसंचालक (शुश्रूषा) यांनी तडकाफडकी आदेश काढून आठ उमेदवारांना बडतर्फ केले. या उमेदवारांनी आता न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.