औरंगाबाद : पदवी परीक्षेत पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना उत्तरांची काॅपी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने समोर आणला. या प्रकरणात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी ॲपेक्स महाविद्यालयातील पदवी परीक्षेसंबंधीच्या प्रकाराचा अहवाल कुलगुरूंना सादर केला आहे. कुलगुरू शुक्रवारी जेबीव्हीसीसाठी मुंबईला असल्याने ते परतल्यावर या प्रकरणावर काय कारवाईचे आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रामीण परीक्षा केंद्र असलेल्या ॲपेक्स महाविद्यालयात बीसीएस प्रथम वर्षाच्या प्रोग्रामिंग ऑफ स्टॅटेस्टिक्स या पेपरवेळी ३ काॅपीबहाद्दर आणि परीक्षेदरम्यान बोलणाऱ्या मुली अशा पाच जणांचे पेपर डाॅ. मंझा यांनी जमा करून घेतले. याप्रकरणात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी २ काॅपीबहाद्दर विद्यार्थ्यांचे म्हणणे, परीक्षा केंद्रावरील परिस्थिती आणि महाविद्यालयाचे म्हणणे असा अहवाल कुलगुरूंकडे सादर केला. ॲपेक्स महाविद्यालयाबाहेर एक युवक येऊन परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पुरवत असल्याच्या घटनेचा आणि परीक्षेपूर्वी हातावर उत्तरे लिहून परीक्षा हॉलमध्ये आढळून आलेल्या विद्यार्थ्याचा अहवाल ॲपेक्स महाविद्यालयाने दिला.
परीक्षेपूर्वी प्रश्न कळाले कसे?
परीक्षेपूर्वी दीड तास आधी प्रश्नपत्रिका ऑनलाइन परीक्षा केंद्रांना उपलब्ध करून दिल्या जातात. खुलताबाद तालुक्यातही अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यापूर्वी विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंग असल्याचे चित्र काही प्राध्यापकांना दिसले. मात्र, पदवी प्रथम वर्ष परीक्षा शुक्रवारी संपल्याने या प्रकरणाचा छडा लागणार कसा, असा प्रश्न आहे.