छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी हिताच्या अभ्यासपूर्ण प्रश्नांना अधिसभा सदस्यांचे समाधान होईल, असे समर्पक व परिपूर्ण उत्तरे द्या. उत्तरात त्रुटी ठेवू नका. चांगल्या सूचनांचा स्वीकार करा, अशा सूचना कुलगुरू प्रमोद येवले यांनी बुधवारी पार पडलेल्या अधिसभा पूर्वतयारी बैठकीत दिल्या. यावेळी अर्थसंकल्प, व्यवस्थापन परिषद निवडणूक आणि सदस्यांच्या प्रश्नोत्तरांची जबाबदारी निश्चित करून बैठकीत सुसूत्रता राहील, याचे पूर्वनियोजन केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणुकीनंतर नवनियुक्त सदस्यांची पहिली बैठक १३ मार्च रोजी होत आहे. या बैठकीत सुरुवातीला व्यवस्थापन परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होईल. त्यानंतर सदस्यांचे प्रश्नोत्तरे आणि शेवटच्या सत्रात पुढील शैक्षणिक वर्षातील अर्थसंकल्पाचे सादरीकरण होणार आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प अधिष्ठाता डाॅ. वाल्मीक सरवदे सादर करणार आहेत. तर निवडणुकीत नियोजन व सुसूत्रतेसह गोपनीयता पाळली जाईल, याकडे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी लक्ष वेधले. प्र. कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, उपकुलसचिव, संबंधित उच्च अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. प्रश्नोत्तराच्या तासात उत्तरे कोण देणार, उत्तरे काय आहेत, ती समर्पक, परिपूर्ण आहेत का ? याचा आढावा कुलगुरूंनी घेतला. अर्थसंकल्पातील तरतुदींवरील प्रश्नांसदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नवनियुक्त सदस्यांच्या प्रशिक्षणाचे काय ?नवनियुक्त सदस्यांना विद्यापीठ कायदे आणि सभागृहांचे कामकाज याबद्दल प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी निवडणुकीवेळी जाहीर केले होते. त्यासंदर्भात नियोजन अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिसभेच्या बैठकीपूर्वी सदस्यांचे प्रशिक्षण होईल की बैठकीनंतर प्रशिक्षण होईल, अद्याप विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही.