छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेल्या मनोज जरांगे यांची आज विभागीय क्रीडा संकुलात सभा पार पडत आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी ३ ते १० पर्यंत सूतगिरणी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी सांगितले. त्याशिवाय जरांगे क्रांती चौकात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दरम्यान आवश्यता वाटल्यास गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन देवकर यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाहिर सभा होत आहे. या सभेपूर्वी छत्रपती संभाजीनगरातील सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुल येथे आज सायंकाळी ५ वाजता जरांगे यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या सभेस मिळणाऱ्या प्रतिसादानुसार ही सभा १४ तारखेला होणाऱ्या सभेचा ट्रेलरच ठरत आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
जबिंदा लॉन्स, कडा परिसर येथे वाहनतळसभेसाठी वाहनाने येणाऱ्या समाजबांधवांसाठी जबिंद लॉन्स, बीड बायपास परिसर आणि कडा कार्यालयाच्या मैदान, जलसंधारण विभागाचे मैदान आणि हेडगेवार रुग्णालयाजवळील सारथीच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील नागरीकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनाऐवजी पायी यावे, असे आवाहन आयोजन समितीने केले.