लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महागामीतर्फे आयोजित ‘तस्मै श्री गुरवे नम:’ या दोनदिवसीय नृत्य महोत्सवाची रविवारी कथ्थक प्रस्तुतीने सांगता झाली. आरंभ, उद्धव व समर्पण या वर्गाद्वारे सादर करून या प्रस्तुतीमधून रसिकांना अनोख्या कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. गुरू-शिष्य परंपरेला नमन करण्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला.संचालिका पार्वती दत्ता यांच्यासह शिष्या व वरिष्ठ प्रशिक्षकांनी यामध्ये सादरीकरण केले. कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवंदनेने झाला. त्यानंतर राग गावती व तीन तालातील माधुरी जोशी रचित ‘गावती सरगम’ प्रस्तुत करण्यात आली. लालित्यपूर्ण पदन्यास आणि तबल्याच्या बोलासोबत घुंगरांच्या नादमाधुर्यपूर्ण जुगलबंदीने रसिकांची दाद मिळविली. आपण जे शिकलो, कसून सराव केला, प्राण ओतून नृत्यदेवतेची आराधना केली, त्याचे प्रस्तुतीकरण करतानाचा आनंद आणि ऊर्जा या विद्यार्थी नृत्यकलाकारांच्या सादरीकरणातून दिसत होती.मंत्रमुग्ध रसिकांनी यानंतर संत नंददास रचित ‘रास पंचध्यायी’ या काव्यात्मक सादरीकरणाचा आस्वाद घेतला. यामध्ये कलावंतांनी आपल्या हावभावातून नटखट कृष्णाच्या बहुआयामी लीलांचे प्रतिबिंब दाखविले. ‘मधुराष्टकम’ रचनेमध्ये श्रीकृष्णाच्या माधुर्याचे वर्णन प्रस्तुत करण्यात आले. यानंतर वय वर्ष १० खालील सुमारे ५० विद्यार्थिनींनी मंचावर संस्कृत श्लोक ‘यतो हस्त स्ततो दृष्टी’वर सादरीकरण करून रसिकांना टाळ्यांचा कडकडाट करण्यास भाग पाडले.वरिष्ठ शिष्यांनी मारू बिहाग रागातील ख्यालावर आधारित अभिनय प्रस्तुती केली. यामध्ये वसकसज्जा, अभिसरिका, स्वधिनपतिका, विप्रलब्धा आणि खंडित नायिकांचा शोध घेण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पार्वती दत्ता यांच्या विलोभनीय एकल प्रस्तुतीने झाली. महोत्सवात रसिकांना वाद्य, गीत आणि नृत्याच्या विलोभनीय मिलाफाची अनुभूती घेता आली.
वाद्य, गीत, नृत्याच्या विलोभनीय मिलाफाची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:03 AM