छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण कुटुंब सुशिक्षित, वडील डॉक्टर, स्वत: अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी असतानाही धर्म, देशविरोधी ‘रिल’ (सोशल मीडियावरील व्हिडीओ) तयार करून शहरात सामाजिक तेढ निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तत्काळ शोध घेत उमर दुर्रानी जिया दुर्रानी (२२, रा. चंपा चौक) याला अटक केली.
सोमवारी सोशल मीडियावर शहरातील एका तरुणाचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताना निदर्शनास आले. देश तसेच धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून सदर तरुण दुचाकीवर उभा राहून सुसाट वेगात जात असल्याचे ‘रिल’ त्याने ‘पोस्ट’ केले. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यावर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता चंपा चौकात राहणाऱ्या उमरने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी उमरला ताब्यात घेत त्याचा मोबाइल जप्त केला. न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
पंधरा दिवसांत चार व्हिडीओ, पोलिसांना उशिरा कळालेउमर सोशल मीडियावर स्वत:ला सोशल मीडिया स्टार म्हणवतो. पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला असला तरी पंधरा दिवसांपासून उमर वादग्रस्त वक्तव्यांचे व्हिडीओ पोस्ट करत होता. १७ सप्टेंबर, २६ सप्टेंबर, २७ सप्टेंबर व ३० सप्टेंबर रोजी असे चार व्हिडीओ त्याने व्हायरल केले. चोवीस तास देखरेखीचा दावा करणाऱ्या सायबर पोलिसांना मात्र याची किंचितही कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर विविध ग्रुप्सवर व्हिडीओ शेअर हाेऊन चर्चा सुरू झाल्यावर पाेलिसांपर्यंत ते पोहोचले व त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे विशेष शाखा, सायबर पोलिसांची सूचकता, सोशल मीडियावरील नजर कमकुवत झाल्याचे दिसून आले. उमर अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून, त्याची पत्नी सुशिक्षित आहे, तर डॉक्टर असलेले वडील नुकतेच शासकीय सेवेतून निवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हिडीओतील अन्य साथीदारांना मात्र पोलिसांनी आरोपी केले नाही.