औरंगाबाद : चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) वतीने गुरुवारी दुसऱ्यांदा एकदिवसीय कोरोना अँटिजन तपासणी शिबिराचे आयोजन वाळूज येथील मराठवाडा अॅटो क्लस्टरमध्ये करण्यात आले. या शिबिरात दिवसभरात ४५० उद्योजक, कामगार व उद्योगांशी संबंधित व्यक्तींनी तपासणी करून घेतली. यात १३ जण पॉझिटिव्ह आढळले.
यापुढे या प्रकारच्या अँटिजन तपासणी शिबिराचे आयोजन दर आठवड्याला करण्यात येईल. ज्यामुळे औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या कोरोनाच्या शिरकावाला रोखता येईल. जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून बाधित व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल. उद्योग, त्यात काम करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील, असे यावेळी ‘सीएमआयए’चे मानद सचिव सतीश लोणीकर सांगितले.
या उपक्रमामुळे औद्योगिक घटकांमध्ये तसेच कार्यरत लोकांमध्ये कोरोनासंबंधी मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या तपासणी शिबिराचा निश्चितच उपयोग होईल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, ‘सीआयआय’चे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ‘मसिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले आदींची उपस्थिती होती. या शिबिरासाठी महापालिकेचे आरोग्य पथक तैनात होते.