औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट पाचपट राहिली. परंतु तरीही महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक राहिली. त्याची नोंद जगभरात झाली. तिसऱ्या लाटेसंदर्भात पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त होत आहे. रुग्णसंख्येत वाढ होऊ नये, यादृष्टीने ही चिंता स्वाभाविक आहे. याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यादिशेने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे वैद्यकीय शिक्षणात साथरोगाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी (दि.१६) औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) कोविड-१९ आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लावण्यात आलेल्या निर्बंधांविषयी अमित देशमुख म्हणाले, हा राजकीय निर्णय नाही, तर तज्ज्ञ, टास्क फोर्सचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जातो. याचे पालन केल्यामुळेच दररोज हजारांवर रुग्ण आढळणाऱ्या शहरांतील रुग्णसंख्या दोन अंकी झाली आहे. तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. पण ती येऊ नये अशी आशा असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, काँग्रेस सेवादलाचे विलास औताडे, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची उपस्थिती होती.
रिक्त पदे मुदतीत भरणारवैद्यकीय उपकरणांसंदर्भात प्रशिक्षणही गरजेचे आहे. सीटी स्कॅन, एमआरआय, व्हेंटिलेटर आदींसंदर्भातील कामांचे सर्टिफिकेट कोर्स सुरू केले आहेत. जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय या संकल्पनेत आतापर्यंत ६ नवी महाविद्यालये मंजूर केली आहेत. इतर नवीन वैद्यकीय महाविद्यालये विचाराधीन आहेत. डाॅक्टर, परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी व्यवस्था उभी केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. ती विहित मुदतीत भरली जातील, असे अमित देशमुख म्हणाले.
केंद्र सरकारवर निशाणाकेंद्र सरकार हे दिशा हरवलेले सरकार आहे. पेट्रोल, डिझेल हे जीएसटीत आणले पाहिजे. परंतु ते आणले जात नाही. चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करण्यात आला आहे, असे म्हणत अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.