वाळूज महानगर : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनाने १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाळूज उद्योगनगरीत चिंतेचे वातावरण पसरले असून, व्यापारी व हातावर पोट असणारे हतबल झाले आहेत.
वाळूज एमआयडीसी परिसरात तीन महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने दहा दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली होती. यामधून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री, रुग्णालये, मेडिकल स्टोअर, पेट्रोल पंप, आदींनी सूट देण्यात आली होती. पहिल्या टप्प्याचा लॉकडाऊन संपला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येतही बऱ्यापैकी घट होत आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाळूज उद्योगनगरीतील व्यापारी, कामगार, मजूर, हातावर पोट असणारे, छोटे-मोठे व्यावसायिक, आदींच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग व व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यापारी व व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सणासुदीत व्यवसाय बंदमुळे हाल
लॉकडाऊन लावण्यापुर्वी व्यापारी, व्यावसायिक व मोलमजुरी करणाऱ्या घटकाचा शासनाकडून विचार केला जात नसल्याने हा घटक लॉकडाऊनमध्ये भरडला जात आहे. लॉकडाऊनमुळे लगीनसराई, रमजान ईद, पाडवा या सणासुदीच्या काळात दुकाने बंद ठेवावी लागल्याने मोठे अर्थिक नुकसान झाल्याचे चंद्रकांत पेरे, सागर चोरडिया, महावीर धुमाळे, आदी व्यावसायिकांनी सांगितले.
याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात मोलमजुरी करणाऱ्या हमाल, बिगारी, मिस्तरी, आदी हातावर पोट असणाऱ्यांना लॉकडाऊनमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला गेल्याने व व्यवसाय बंद पडल्याने शासनाने मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करण्याची मागणी गणेश राऊत, गणेश भादे, समीर शेख, आदींनी केली आहे.