औरंगाबाद : सध्या भाजपात खुनाचा आरोपी, वेडी माणसे सोडली तर कोणालाही सहज प्रवेश मिळतो. हा काळानुसार झालेला बदल असल्याची टोलेबाजी विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पक्षातील ‘इनकमिंग’वर केली.माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात जुने-जाणते आणि निष्ठावान कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. भाजपाचा आज महावृक्ष झाला आहे. मागील २५ वर्षांत जसे काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.हरिभाऊ बागडे यांनी तोच धागा पकडत पक्षात कोणाला घ्यायचे, याबाबत आपण बोलू शकत नाही. पूर्वी पक्षात घेताना आणि तिकीट देताना मात्र खूप चौकशी केली जायची. त्यानंतर प्रवेश दिला जात असे. आता केवळ मर्डर करणारे आरोपी आणि वेड्या माणसांनाच प्रवेश दिला जात नाही, असे ते उपहासाने म्हणाले.मोठ्या कालावधीनंतर भाजपाची लाट देशात आली आहे. भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे चांगले यश मिळते आहे, अशात मूळ विचार आणि हेतूही जपला पाहिजे, असेही बागडे म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मात्र सध्याच्या पक्ष प्रवेशाचे समर्थन केले. सध्या आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा करायचा, या सूत्रानुसार काम सुरू असल्याचेहीते म्हणाले.>जुन्या कार्यकर्त्यांची खंतपूर्वी पक्षाचा कार्यकर्ता घरी आला की आनंद व्हायचा. आता पक्ष बदनाम होईल अशा लोकांनाही प्रवेश दिला जातो, अशी खंत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बागडे यांच्याकडे बोलून दाखवली.
भाजपात हल्ली कोणालाही प्रवेश, हरिभाऊ बागडे यांची ‘इनकमिंग’वर जोरदार टोलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:17 AM