छत्रपती संभाजीनगर : गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते. त्यामुळे पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट रहावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत नमूद केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली असून जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता कशी असेल, याची माहिती देताना जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, प्रभोदय मुळे आदींची उपस्थिती होती. निरीक्षक आल्यानंतर वेबकास्ट व्होटिंग सेंटरचा निर्णय होणार आहे. याबाबत आयोगाने मार्गदर्शन केले आहे. जी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत त्यावर सूक्ष्म निरीक्षण असतील, अशी काही केंद्रे आहेत. ज्या ठिकाणी येथून मागे काही झाले नाही, परंतु यावेळी काहीही होऊ शकते, असे अहवाल आमच्याकडे गुप्तचर संस्थांकडून आले आहेत.
अंडरकरंट पोलिस आणि जिल्हा प्रशासनापर्यंत येत नाही काय, या प्रश्नाचे उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत. सोशल मीडियाबाबत सेल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी टीम असणार आहे. सोशल मीडियात कुणीही प्रक्षोभक, धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्यास कडक कारवाई होईल.
अशी असेल आचारसंहिता.....प्रचार साहित्य छापून देणाऱ्यांना मुद्रक, प्रकाशक, बिल रकमेची माहिती देणे बंधनकारक.नवीन कुठलाही परवाना प्रशासकीय पातळीवरून मिळणार नाही.कुणाच्याही मालमत्तेवर एनओसीविना झेंडे, पोस्टर, स्टिकर लावता येणार नाही.फेक न्यूज व्हायरल करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष असेल.जिल्ह्यात आणि शहरातील सीमांवर चेकपोस्ट असणार.
उमेदवार वाढल्यास काय करणार...ईव्हीएमद्वारे ३८४ उमेदवारांपर्यंत मतदान घेता येते. यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर आयोगाने याबाबत सूचना दिल्या आहेत. उमेदवार जास्त आल्यास बॅलेट पेपर मतदान घेण्याची तयारी देखील प्रशासन ठेवून आहे. परंतु, तशी वेळ येणार नाही. ग्रामीण भागासह शहरी भागातून आढावा घेण्यात येत आहे.
शहर संवेदनशील आहे....पोलिस आयुक्त लोहिया म्हणाले, शहर संवदेनशील आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी एसआरपीच्या ३ व सीआरपीएफच्या दोन तुकड्या मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. शहरात ६० पोस्ट असातील . ५४ इमारतीतील ६६ संवदेनशील बूथ आहेत. ४ डीसीपी, ८ एसीपी, १४७ एपीआय, सुमारे ३ हजार पोलिस कर्मचारी बंदेाबस्तात असतील. शहरातील १२०० हत्यार परवाने जमा केले आहेत. तर, ग्रामीण भागातील ५५० परवाने जमा केले आहेत.