औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून मुस्लिम बांधव ‘निकाह’पद्धतीवर अनावश्यक पद्धतीने लाखो रुपये खर्च करीत आहेत. हे अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांना अजिबात अपेक्षित नाही. ‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले.
रविवारी सायंकाळी ठीक ५.३० वाजता ‘असर’ची नमाज इज्तेमास्थळी अदा करण्यात आली. ९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. जिथे जागा मिळेल तिथेच नमाज अदा करण्यात आली. रविवारी या परिसरात कुठेच पाय ठेवायला जागा नव्हती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी. यातच अल्लाह ‘राजी’होऊ शकतात. लग्नकार्य अत्यंत साधेपणाने साजरे करायला हवे. साथींनी दावतच्या कामात आपले अधिक योगदान दिले पाहिजे.
आयुष्यात यशस्वी होण्यामागे साधेपणा खूप आवश्यक आहे. आपल्या अपत्यांवर कसे संस्कार करणार हे अगोदरच ठरवून घ्या. एकोप्यातील गोष्टी चार जणांसमोर अजिबात सांगू नये, असेही साद साहब यांनी सांगितले. हजरत साद साहब यांचे मार्गदर्शन लाखो साथी बांधव अत्यंत शांतपणाने ऐकत होते. इज्तेमामध्ये दिल्लीहून आलेले हजरत मौलाना साद साहब यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी साथी बांधव आतुर झाले होते. मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी तीनवेळेस मार्गदर्शन केले. उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच दुआ होणार आहे.
तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाहऔरंगाबाद शहरात यापूर्वी जिल्हानिहाय इज्तेमामध्ये शेकडोंच्या संख्येने सामूहिक विवाह लावण्यात आले आहेत. तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाह लागण्याची ही पहिलीच वेळ होती. लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने लग्न सोहळा होणे हे कधीतरी घडत असते. मुख्य मंडपाच्या परिसरात जिल्हानिहाय लग्न लावण्यात आले.