औरंगाबाद : जलशक्ती मंत्रालय भारत सरकारव्दारे पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व नागरी स्वायत्त संस्था, काॅर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशासकीय संस्था यांना राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये भाग घेण्यासाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी २०२१ पूर्वी केंद्रीय भूजल बोर्ड नोडल एजन्सीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान
औरंगाबाद : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केल्यामुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान सह्याद्री राज्य अतिथीगृह मुंबई येथे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी हा सन्मान करण्यात आला. शहरात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २१०९ या काळात ५६० अपघातात १९९ मृत्यू झाले. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या काळात ४०६ अपघातात १३६ मृत्यू झाले. गेल्या वर्षी २८ टक्क्यांनी अपघाताची संख्या कमी झाली, मृत्यू संख्येत ३२ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे हा सन्मान करण्यात आला आहे.
विविध भागांमध्ये लोकार्पण व भूमिपूजन
औरंगाबाद: ईटखेडा, समतानगर, नक्षत्रपार्क, नक्षत्रवाडी या विविध भागांमध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या निधीमधून झालेल्या कामांचे लोकार्पण व नव्याने सुरू होणाऱ्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक धोंडाबाई वाघ व इतर महिलांच्या हस्ते झाले. यावेळी नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाट आदींची उपस्थिती होती.
नवकलाकारांना प्रमाणपत्र वाटप
औरंगाबाद : महाश्वेता कलामंच, जय रूद्रा फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिनय प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. समारंभात नवकलाकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, सुभेदार बांगर, सुरज मुळे, ज्ञानेश्वर काळे आदींची उपस्थिती होती.