अर्धापूर ( नांदेड ) : शहरातून जात असलेल्या तामसा-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरु असल्याने जोरदार पावसात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा फटका येथील नागरिकांना बसत आहे.
अर्धापूर ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. हा महामार्ग तामसामार्गे जातो. रस्त्याचे काम रूद्रायणी या कंपनीमार्फत सुरु असून खोदकाम केल्यामुळे रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. या रस्त्याची दोन्ही बाजू खोदून ठेवण्यात आली आहेत. त्यात पाणी साचले असून निचरा न झाल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. या रस्त्यावर लहान ,लोण, चाभरा अनेक गावे असून येथील ग्रामस्थ, व्यवसायिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अर्धापूर व नांदेड असा प्रवास करतात.
पूर्वी असलेला डांबरी रस्ता खोदून ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्यावर सगळीकडे पाणी साचत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी या रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडाच, परंतु चालणे सुध्दा अवघड बनले आहे. तसेच अनेक दुचाकीधारक रस्त्यावर घसरून पडले आहेत तर अनेकांच्या मोटरसायकल पाण्यातच बंद पडल्याने गाडी ढकलत आणावी लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
वेळत काम करायचे नाही तर खोदले का ? वाहनचालकांच्या व नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी. - संजय लोंणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड