औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ हजार ३२८ अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज अवैध तर १६ हजार ९४२ उमेदवारांचे १६ हजार ९५७ अर्ज वैध ठरविण्यात आले. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९ हजार ९६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारी उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती.
या छाननीत गंगापूर तालुक्यातील ८५ अर्ज अवैध ठरले. वैजापूर ३७, सिल्लोड ६५, कन्नड ४८, पैठण २२, औरंगाबाद ५१, फुलंब्री २०, सोयगाव ३३ व खुलताबाद तालुक्यात २० उमदेवारी अर्ज छाननीअंती बाद ठरविण्यात आले. वैजापूर तालुक्यातील २६४९ उमेदवारांचे अर्ज वैध तर सिल्लोड २३१९, कन्नड २०४३, पैठण २४५४, औरंगाबाद २१८१, गंगापूर २२२६, फुलंब्री १४४८, सोयगाव ९५३ आणि खुलताबाद तालुक्यातील ६६९ उमदेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
४ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ९० प्रभागांसाठी ५६८३ सदस्यसंख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.