औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी परीक्षेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, परीक्षा सुरू होऊनही विद्यार्थ्यांचे परीक्षा फाॅर्म न भरणारी महाविद्यालये समोर आली. त्यामुळे ऐनवेळी अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी उन्हाळी परीक्षेच्या सात दिवस आधीपर्यंतच अर्ज भरण्याची मुभा देण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत, तर दुसरीकडे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. बीएसस्सीच्या ४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाचा प्रयत्न आहे. काही तांत्रिक त्रुटी आल्या. मात्र, विद्यापीठाचा ५ टक्के दोष असेल, तर २५ टक्के दोष महाविद्यालयांचा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज जबाबदारीने अचूक व वेळेत भरणे अपेक्षित आहे. चुका झाल्या त्या मान्य आहेत. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नाही. यात चूक असणाऱ्यांवर कारवाई होईल; तसेच महाविद्यालयांनी जबाबदारी ओळखली पाहिजे. तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही कुलगुरू म्हणाले.
परीक्षेवर आता तिसरा डोळापरीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या २६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत परीक्षा कक्षात सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयाला परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षेपूर्वी परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्या. अन्यथा परीक्षा केंद्र दिले जाणार नसल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी महाविद्यालयांना कळवले आहे.